कर्जमाफीची योग्य वेळ आली ; शेतीचा मसनवाटा झालाय, आनखी कोनती योग्य वेळ येनं बाकी

कर्जमाफीची योग्य वेळ आली ; शेतीचा मसनवाटा झालाय, आनखी कोनती योग्य वेळ येनं बाकी
राज्यातील शेतकऱ्यांचे खरिपाचे मोठे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कर्जमाफीसाठी ज्या ‘योग्य वेळेची’ प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले होते, ती ‘योग्य वेळ’ आता आली आहे. कारण राज्यातल्या एकूण खरिपापैकी ४० ते ५० टक्क्यांपर्यंत खरीप पीक पावसामुळे वाया गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे, सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि पंजाब राज्याच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी नेते आणि राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.

मदतीत कपात आणि जुने दर

 

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार एनडीआरएफच्या माध्यमातून मदत करत आहे, परंतु या मदतीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी कपात करण्यात आली आहे.
कोरडवाहू पिके
मागील वर्षी ₹१३,६००
यंदा ₹८,५०० 
बागायती पिके
मागील वर्षी ₹२७,००० यंदा ₹१७,०००
फळपिके
मागील वर्षी ₹३६,०००
यंदा ₹२२,५००
शिवाय, नुकसान भरपाईची हेक्टरी मर्यादाही ३ हेक्टरवरून कमी करून २ हेक्टर करण्यात आली आहे. आज शेतकऱ्याला प्रति हेक्टर निविष्ठांवर (बियाणे, खते इ.) जवळपास २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. अशावेळी हेक्टरी केवळ ८,५०० रुपये मदत देऊन शेतकऱ्यांचा हा खर्चही भरून निघणार नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही मदतीची दरपत्रके १० वर्षांपूर्वी ठरवलेली आहेत, तर मागील काही वर्षांत शेतीतील उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे.

पीक विमा योजनेतील नवीन नियम

 

सरकारच्या नवीन सुधारित पीक विमा योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या संकटामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’ आणि ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ हे महत्त्वाचे ‘ट्रिगर’ यंदा वगळण्यात आले आहेत. आता भरपाई केवळ हंगामाच्या शेवटी कृषी विभागाने केलेल्या ‘पीक कापणी प्रयोगांवर’ (Crop Cutting Experiments) आधारित मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्याला किमान ३० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यासच भरपाईसाठी तो पात्र ठरणार आहे, कारण ३० टक्क्यांचा ‘जोखीम स्तर’ निश्चित करण्यात आला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने कर्जमाफी आणि वाढीव मदतीचे निर्णय घेणे आवश्यक आहे.अजून कोनती योग्य वेळ येनं बाकी आहे असा सवाल शेतकरी करत आहेत.

Leave a Comment