कापसाला मिळनार 8110 रूपयांचा भाव, त्यासाठी हे काम करा..
सीसीआय कापूस खरेदीला मुहूर्त लाभला असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. यावर्षी 1 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ‘कपास किसान’ ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या कापसाची हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आतापर्यंत केवळ 30 टक्के शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सीसीआयमार्फत 15 ऑक्टोबर 2025 पासून प्रत्यक्ष सुरू केली जाईल. सुरुवातीला विदर्भातील अमरावती जिल्ह्यासह 12 कापूस खरेदी केंद्रांवर ही खरेदी सुरू होईल.
यावर्षी कापसाला 591 रुपयांनी हमीभाव वाढवून 8110 रुपये प्रति क्विंटल लांब धाग्याच्या कापसासाठी भाव निश्चित करण्यात आला आहे. याच हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहेत, त्यामुळे या नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मुदतवाढीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कापसावरील आयात शुल्क हटवल्यामुळे कापसाच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक करू शकतात. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी सीसीआयमार्फत विक्री करणे हाच एक उत्तम पर्याय आहे.
सीसीआय कापूस खरेदीसाठी दुसरी महत्त्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण झालेली असणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी आणि ‘कपास किसान’ ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. सीसीआय 8 ते 12 आर्द्रतेपर्यंतचा कापूस खरेदी करते. आर्द्रता वाढल्यास कापसाच्या भावात घट होते.
यावर्षी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. परतीच्या पावसामुळे कापूस भिजल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी ‘कपास किसान’ नोंदणी आणि ई-पीक पाहणी ही दोन्ही कामे शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण करावी लागतील.यावर्षी कापसाचा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे आणि कापूस उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.