वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
गजानन जाधव (व्हाईट गोल्ड ट्रस्ट) यांनी दिलेल्या या हवामान अंदाजानुसार, हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, राज्यातून मान्सूनने १३ ऑक्टोबर रोजी निरोप घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. मात्र, ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. १५ ऑक्टोबरपासून राज्याच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही भागात ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे…
वादळी पावसाचा तपशीलवार अंदाज
१५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये प्रामुख्याने ढगाळ हवामान राहून दुपारनंतर काही ठिकाणी वादळी पाऊस अपेक्षित आहे. सध्याच्या अंदाजानुसार, वादळी पावसाचे प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात थोडे जास्त राहू शकते. या तुलनेत, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज गजानन जाधव यांनी दिलाय.
आठवड्याभराच्या अंदाजानुसार, सोमवारपासून रविवारपर्यंत म्हणजेच पुढील सात दिवस याच पद्धतीचे हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
या बदललेल्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी १५ तारखेपूर्वी शक्य असल्यास सोयाबीन काढावे. जर सोयाबीन काढले नसेल आणि शेतात पसरलेले असेल, तर ते जमा करून उंच जागी गंजी मारून झाकून ठेवावे. तसेच, १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान कुठल्याही पिकाचा पसारा शेतात न ठेवता तो गोळा करून झाकून ठेवावा.