रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, या जिल्ह्यांना अतीमुसळधार
डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, 25-27 सप्टेंबर महाराष्ट्रातील विविध भागांत हवेच्या दाबात बदल होऊन पावसाचे वितरण काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी अधिक प्रमाणात राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राचे उत्तर मध्य आणि पूर्व भागात काही दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार (१५ ते ६० मि.मी.) पावसाची शक्यता आहे, तर मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम, परंतु काही काळ जोरदार पाऊस (१० ते ४० मि.मी.) अपेक्षित आहे.
विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथे हलक्या ते मुसळधार (७ ते ७० मि.मी.) पावसाची शक्यता असून, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार (१० ते ४५ मि.मी.) पाऊस होण्याचा अंदाज आहे. या दरम्यान काही काळात पावसात उघडीप व सूर्यप्रकाश देखील जाणवेल अशी माहिती साबळे यांनी दिली.
दीर्घकालीन अंदाजानुसार, सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यामुळे पुढील काळात उघडीपीचा काळ वाढत जाईल आणि परतीचा मान्सून साधारणपणे १० ते १२ ऑक्टोबर पर्यंत माघार घेईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर बराच कमी होईल.
मात्र, ‘ला निना’ (La Niña) च्या प्रभावामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या वर्षी थंडीचा कालावधी आणि प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असून ती १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दरम्यान चांगली जाणवेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलाय..