प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू ; पहा काय आहे ही योजना
केंद्र शासनाच्या वतीने देशातील १०० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ (PMDDKY) सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्राला नवी दिशा देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. पुढील पाच ते सहा वर्षांसाठी ही योजना देशभरात राबवली जाणार असून, यासाठी एकूण २४ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्लीतील पुसा येथे देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात राज्याचे कृषीमंत्रीही एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ एका मंत्रालयाच्या योजनांचा समावेश नसून, ११ मंत्रालयांच्या मिळून जवळपास ३६ योजना १०० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे राबवल्या जाणार आहेत. याअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्जाची उपलब्धता, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, पीक काढणीनंतर गोदामांची स्थिती सुधारणे, आणि आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती यांसारख्या विविध बाबींवर भर दिला जाणार आहे. यासोबतच, किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची उपलब्धता सुनिश्चित करणे, शेतीमाल व फळपिकांवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे, पीक पद्धतीमध्ये बदल करणे आणि सिंचन तसेच यांत्रिकीकरणाच्या सुविधा पुरवणे हे देखील या ३६ योजनांच्या माध्यमातून साध्य केले जाणार आहे.
या योजनेसाठी देशभरातून १०० जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक जिल्ह्यांची निवड (दुसरा क्रमांक) झाली आहे.