पाऊस लांबला, 02 आँक्टोंबरपर्यंत पावसाचा धुमाकूळ… रेड अलर्ट

पाऊस लांबला, 02 आँक्टोंबरपर्यंत पावसाचा धुमाकूळ… रेड अलर्ट

 

रामचंद्र साबळे ; महाराष्ट्रावर आज (ता. २८) १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे काही भागात मध्यम पावसाची शक्यता, तर काही काळ उघडीप राहील. उद्या (ता.२९) महाराष्ट्रावर हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल.

 

मंगळवारपासून गुरुवार (ता. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) पर्यंत महाराष्ट्रावर हवेचे दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्यता राहील. शुक्रवार व शनिवारी (ता.३, ४ ऑक्टोबर) हवेच्या दाबात वाढ होऊन ते १००४ हेप्टापास्कल इतके होताच पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहणे शक्य आहे.

 

आता सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले असून, त्यामुळे दक्षिण गोलार्धात तापमान वाढण्यास सुरुवात होईल. त्या भागात हवेचे दाब कमी होऊन वारे मोठ्या प्रमाणात दक्षिण गोलार्धातही ढग वाहून आणतील. त्यामुळे महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याची स्थिती १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान निर्माण होईल. आणि तेव्हा पावसाचे प्रमाण कमी होईल. प्रखर सूर्यप्रकाश जाणवेल…

 

या वर्षी प्रशांत महासागराच्या पेरूजवळ विषुववृत्तीय भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १४ अंश सेल्सिअस, तर इक्वेंडोरजवळ २३ अंश सेल्सिअसपर्यंत थंड झाल्याने आणि यापुढेही डिसेंबरपर्यंत ते थंड राहून ‘ला-निना’चा प्रभाव जाणवेल, असा अंदाज एन.ओ.ए.ए. या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच दिला आहे. त्यामुळे मॉन्सून महाराष्ट्राबाहेर पडण्यास थोडा जास्त विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येही थोडाफार पाऊस होणे शक्य आहे.

 

Leave a Comment